अदानी वेंचर्स विरोधात प्रकल्पग्रस्तांचा एल्गार

20 नोव्हेंबरपासून सर्व पक्षीयांचे बेमुदत उपोषण

| चिरनेर | वार्ताहर |

उरण-धुतुम येथील इंडियन ऑईल अदानी वेंचर्स लिमिटेडच्या रासायनिक द्रव्ये साठवण प्रकल्पात प्रकल्पग्रस्तांना डावलण्यात येत आहे. परप्रांतीय कामगारांच्या भरती विरोधात स्थानिक भुमीपुत्र संतप्त झाले आहेत. या विरोधात भुमीपुत्रांनी 20 नोव्हेंबरपासून धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली 23 प्रकल्पग्रस्त बेमुदत उपोषण करणार आहेत. त्याला सर्व राजकीय पक्षांतील नेते उपस्थित राहणार आहेत.

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील इंडियन ऑईल टॅन्किंग हा रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प उभारण्यात आला आहे. 25 वर्षांपूर्वी 57 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी धुतुम गावातील सुमारे 83 शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. मात्र प्रकल्पात अद्यापही फक्त 27 प्रकल्पग्रस्तांनाच नोकरीत सामावून घेतले आहे. उर्वरित 56 शेतकरी आणि त्याचे सुमारे 200 वारसदार अद्यापही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दोन वर्षांपूर्वी हा रासायनिक द्रव्ये साठवण करणारा प्रकल्प देशातील सर्वात मोठे भांडवलदार अदाणी यांच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्सने घेतला आहे. प्रकल्पाचे मालक बनलेल्या अदानी वेंचर्सने कामगार भरतीमध्ये स्थानिकांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आहे. धुतुम गावात अनेक तरुण-तरुणी उच्चशिक्षित, पदवीधर आहेत. मात्र नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याऐवजी परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे. याबाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. आस्थापनावर भरती करण्यात आलेल्या परप्रांतीय कामगारांना वगळून तत्काळ स्थानिकांची कामगारांची भरती करण्याचा निर्णय 15 दिवसात घेण्यात यावा, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली होती. मात्र ग्रामपंचायतीच्या पत्राची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे धुतुम ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

उपोषणानंतरही सकारात्मक तोडगा न निघाल्यास प्रसंगी न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्धार धुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील यांनी गुरुवारी (16) आयोजित पत्रकार परिषदेतून जाहीर केला आहे. याप्रसंगी सर्वच पक्षीय सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version