दरवाढीविरोधात शेकापचा एल्गार

मुरुड तहसीलदारांना दिले निवेदन
कोर्लई | वार्ताहर |
राज्यातील जनता महागाईने त्रस्त असून, शासनाकडून घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वेळोवेळी सातत्याने होणार्‍या दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुका चिटणीस मनोज भगत यांच्या हस्ते मुरुड तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी हे निवेदन स्वीकारले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडून घरगुती वापरात असलेल्या गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ केली जात आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यासह राज्यातील गोरगरिबांसह सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गरिबांना तर एक वेळचे जेवण मिळणेदेखील दुरापास्त झाले आहे.
तरी शासनाकडून घरगुती वापरात आवश्यक असलेल्या गॅस सिलिंडरच्या तसेच पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या निवेदनाद्वारे करण्यात येत असून, आपणाकडून आमच्या पक्षाच्या भावना सरकारकडे सादर करण्यात याव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शेकाप तालुका चिटणीस मनोज भगत, मनोहर बैले, विजय गिदी, मोतीराम पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती नीता गिदी, अजित कासार, जि.प. सदस्या नम्रता कासार, सी.एम. ठाकूर, तुकाराम पाटील, संतोष पाटील, विकास दिवेकर, रमेश दिवेकर, शरद चवरकर, महेश मापगावकर, प्रतीक दळवी, मुब्बशिर लालसे, ऋत्वेज मकू, महेश पाटील, राहिल कडू, रिजवान फहीम यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version