कचर्‍याच्या विरोधात दहा गावांचा एल्गार

मुख्याधिकारी, तहसीलदारांना निवेदन

| कोलाड | वार्ताहर |

रोहेकरांच्या कचर्‍याचा प्रश्‍न पुन्हा पेटला असून, वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कचर्‍याचा विषय अद्याप जैसे थे आहे. डम्पिंग ग्राउंड अजूनही उपलब्ध न झाल्याने रस्ता, कालवा, सर्वच गटारांत अक्षरशः कचराच कचरा दिसून येत आहे. या विरोधात परिसरातील दहा गावांनी एल्गार पुकारला आहे. याबाबत तातडीने उपाययोजना केली जावी, या मागणीसाठी ग्रामस्थांच्यावतीने मुख्याधिकारी, तहसिलदार आणि पोलीस यंत्रणेला निवेदन देण्यात देण्यात आलेले आहे.

उडदवणे, सांगडे, मुठवली, मालसई, गावठाण, सोनगाव, धामणसई, पिंगलसई आदी परिसरातील नागरिकांचा रोहा नगरपालिका कचरा डंपिंग ग्राऊंडला सुरुवातीपासून विरोध असतांना देखील या ठिकाणी हा कचरा डेपो थाटला गेला आहे. त्यात संपूर्ण शहरातील कचरा हा कुंडलिका नदीपलीकडील धामणसई पंचक्रोशी हद्दीत केला गेला आहे. परिसरातील त्या ग्रामस्थांना गेली अनेक वर्षे दुर्गंधीशी सामना करावा लागत आहे. यावर विविध प्रक्रिया केली जात असतांना देखील हे सगळं कचरा फेकाफेकी नाट्य सुरू आहे.

काही दिवसांपासून चक्क तालुक्यातील सर्वात मोठी समजली जाणारी वरसे ग्राम पंचायत ही देखील त्यांची कचरा समस्या दूर करण्यासाठी या कचरा डम्पिंग ग्राऊंडचा आधार घेत, संपूर्ण कचरा या डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याविरोधात दहा ते अकरा गावच्या ग्रामस्थांनी एकत्रितपणे येऊन, असलेला कचरा डम्पिंग ग्राऊंड हटाव ही मोहीम हाती घेतली आहे. वरसे ग्रामपंचायतीची कचरा डम्पिंगची समस्या ही लवकरच सुटेल असा विश्‍वास प्रशाकीय यंत्रणेने केला होता. मात्र, ही समस्या काही केल्या सुटेना त्यामुळे वरसे ग्राम पंचायत हद्दीतील कचरा समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.

खत प्रकल्प कागदावरच
वरसे ग्रामपंचायत अनेक वर्षे भुनेश्‍वर हद्दीतील जागेवर कचरा टाकत आले. संबंधीत डंपिंग ग्राउंड जागेच्या कंपाउंड व कचरा खत प्रकल्पासाठी लाखो रुपये मंजूर झाले. मात्र तो अद्याप कागदावरच आहे. ज्या जागेवर डम्पिंग ग्राऊंड आहे, ती जागा ही वनविभागाची आहे.कचर्‍यामुळे तेथील भातशेतीही नापिक झालेली आहे. त्यामळे या परिसराती ग्रामस्थांचा डम्पिंग ग्राऊंडला विरोध आहे.

Exit mobile version