कामे न करता मजगांव ग्रामपंचायतीत निधीचा अपहार ?

सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करा; नरसिंह मानाजी यांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन

| अलिबाग | प्रतिनिधी |

ऐन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकी पार्श्वभूमीवर मुरुड तालुक्यातील मजगांव ग्रामपंचायतीत कामे न करता थेट निधीचा अपहार झाला असून संबंधित सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरसिंह मानाजी यांनी एका निवेदनाद्वारे मुरुड तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, मजगांव नवी आळी येथील पाईपलाईन टाकणे व मजगांव पाण्याच्या टाकीवर वॅाटर फिल्टर बसविणे ही कामे १५व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर असून सदर कामाचे कार्यारंभ आदेश दि.७ जुलै २०२१ रोजी देण्यात आले आहेत.
उपरोक्त दोन्ही कामांबद्दल माहिती घेतली असता प्रत्यक्ष कोणतेही काम सुरू नसून केवळ मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पाईप ठेवल्याची तक्रार दि.१० डिसेंबर २०२१ रोजी दिली असता या प्रकरणी दिलेल्या कागदोपत्री माहितीप्रमाणे मजगांव सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी सदर कामाबद्दल लेखी माहिती सादर करताना संबंधित काम पुर्वीचेच असून सद्यस्थितीत कोणतेही काम सुरू नाही. सदर कामाचे पाईप कोणालाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीने रस्त्यालगत चार ठिकाणी ठेवल्याचे त्यांनी आपणास स्पष्टिकरण दिले आहे.
आपणाकडून दिलेल्या माहितीच्या आधारे या दोन्ही योजने संबंधी अधिक माहिती घेतली असता उपरोक्त दोन्ही कामांची संपूर्ण बिले ठेकेदारास अदा करून निधीचा अपहार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे, मालमत्तेचा निधीचा अपहार करणे, मूळ दस्तऐवजात खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे यासाठी जबाबदार असल्यास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सचिव,ग्रामसचिव, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अन्य संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात आर्थिक गुन्ह्यासंबंधी फौजदारी खटला दाखल करण्यात यावा, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता करणे अथवा ग्रामपंचायत मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवजात खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने जबाबदार व्यक्तिंविरुद्ध फौजदारी गुन्हा तत्काळ दाखल करावा. संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गुन्हे नोंदवून घेण्यास टाळाटाळ न करता ते तत्काळ नोंदवून घेण्यात यावेत. असे महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून वरील संदर्भिय शासन परिपत्रकात स्पष्ट निर्देश दिले आहेत.
आपणाकडून तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन ग्रामपंचायत मजगांव सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी नरसिंह मानाजी यांनी दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून सदर निवेदनाच्या प्रती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version