| मुंबई | प्रतिनिधी |
येत्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकीत आघाडीच्या बोधचिन्हाचे अनावरण केले जाणार आहे, अशी माहिती खा.संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत येथे प्रसारमाध्यमांना दिली.
इंडियाच्या बैठकीला 38 राज्यांतील पत्रकार येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने या बैठकीचे यजमानपद स्वीकारलं आहे. 30 तारखेला उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन 31 आणि 1 तारखेच्या बैठकीची माहिती देणार आहेत. मुंबईच्या ग्रँड हयात येथे बैठक होत आहे. या बैठकीत इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण केलं जाणार असून लोगोमध्ये देश आणि देशाची एकता असणार आहे, असं राऊतांनी सांगितलं. हा देश एकत्र राहण्यासाठी, अखंड भारतासाठी जे आवश्यक आहे, ते या लोगोमध्ये आहे. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी ही आघाडी आहे. नवीन पक्षदेखील आमच्यात सामील होतील, असंही राऊतांनी स्पष्ट केलं. त्यामुळे इंडिया आघाडीचा लोगो कसा असेल हे 1 सप्टेंबर रोजी स्पष्ट होईल.