चारसुत्री भात लागवडीवर भर

जिल्ह्यामध्ये भात लावणीला सुरुवात

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने बुधवारपासून सुरूवात केली असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे लावणीच्या कामांनादेखील जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मात्र, त्यामध्ये चारसूत्री भात लागवडीवर शेतकऱ्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये या आधुनिक पध्दतीचा अवलंब केला जात आहे.

पारंपारिक भात लागवडीपासून शेतकऱ्यांना भाताचे उत्पादन मिळत नाही, अशी ओरड कायमच आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या पुढाकाराने चारसुत्री लागवड पध्दत सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी गावागावात जाऊन चार सुत्री भात लागवड पध्दतीचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने उशीरा एंट्री मारली आहे. त्यामुळे भात लावणीची कामेदेखील लांबणीवर गेली आहेत. आठ ते दहा दिवस लावणीची कामे उशीरा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, बुधवारी सकाळपासून पाऊस सुरु असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचले होते व शेतही पाण्याने भरू लागली आहेत. पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावून गेला आहे. नांगरीच्या कामांसह लावणीच्या कामालादेखील सुरुवात करण्यात आली आहे.

पारंपारिक भात लावणीपेक्षा शेतकऱ्यांनी चारसुत्री भात लागवड करण्यावर भर दिल्याचे दिसून आले आहे. कमी रोपे, कमी खर्च तसेच कमी मजूरकर आणि उत्पादन अधिक यामुळे या पध्दतीने लागवड करण्यास शेतकरी सरसावले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कृषी सहाय्यकांच्या मदतीने या पध्दतीने लागवड केली जात आहे. जिल्ह्यातील सुमारे 800हून अधिक हेक्टर क्षेत्रामध्ये चारसुत्री पध्दतीने लागवड केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

कृषी विभागाच्या सहकार्यातून चार सुत्री भात लागवड पध्दतीचा अवलंब केला आहे. या लागवडीतून मजूरीच्या खर्चाची बचत होण्याबरोबर वेळ ही वाचला जात आहे. त्यामुळे ही पध्दत चांगली आहे, असा विश्वास आहे. चारसुत्री लागवड करताना स्वतः कृषी विभागाचे अधिकारी शेतावर असतात.

अशोक शिंदे, शेतकरी
Exit mobile version