आ. शेखर निकम
। चिपळूण । वार्ताहर ।
ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी प्राप्त व्हावी, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या या क्रिकेट अकॅडमीत प्रतिभावंत खेळाडू नक्कीच तयार होतील व आपल्या या खेळाचे कौशल्य विविध स्तरावर दाखवतील, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले आहे. गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमीच्या नेट स्ट्रक्चरचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे, या भव्य क्रीडा संकुलामध्ये चिपळूण संगमेश्वरचे विद्यमान आ.शेखर निकम यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली गोविंदराव निकम क्रिकेट अकॅडमी 2018 पासून सावर्डे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण सीझन क्रिकेटचे देत आहे.
या अकॅडमीच्या नेट स्ट्रक्चरचे उद्घाटन आ. शेखर निकम यांच्या शुभहस्ते नेट स्ट्रक्चरची फित कापून व ज्येष्ठ खेळाडू गणेश सावर्डेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच खेड येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हा स्तरीय 14 वर्षाखालील निवड चाचणीतून निवड झालेल्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अकॅडमीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, सह्याद्री शिक्षण संस्थेचे सचिव महेश महाडिक, सावर्डे गावचे उपसरपंच जमीर मुल्लाजी, सतीश सावर्डेकर, गणेश सावर्डेकर, क्रीडाशिक्षक उदयराज कळंबे, रोहित गमरे, अमृत कडगावे आदी मान्यवर आणि खेळाडू उपस्थित होते.