रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाचा स्तुत्य उपक्रम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने घरच्या घरी भाजीपाला लागवडीवर भर दिला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परसबागेसाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. परसबाग तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाच्या स्वरूपात पाच हजार रुपये दिले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यावर मंजूरी मिळाल्यानंतर हे अनुदान त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावणे हा उद्देश समोर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून परसबागेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
घराच्या मोकळ्या जागेत फुले, भाजीपाला लागवड करण्यास अनेकांना आवडते. लॉकडाऊनच्या काळापासून हा प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आला. बाजारातील भाज्यांच्या वाढत्या दरामुळे भाजी विकत घेणे देखील सर्वसामान्यांना परवडत नाही. काही भाज्यांची लागवड करताना रासायनिक खतांचा मारा मोठ्या प्रमाणात केला जातो. भाज्या खाल्यानंतर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्याबरोबरच नागरिकांना घरच्या घरी विषमुक्त भाजी तयार करता यावी, यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी घरच्या घरी भाजीपाला लागवड केल्यास त्याबाबत अर्ज ऑनलाईन केल्यावर शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी परसबाग योजना सुरु करण्यात आली आहे. परसबाग लागवड करण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज स्वीकृतीपासून लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्याची सुविधा पोर्टलद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकत्रित संगणकीय सोडत पध्दतीने लाभार्थी निवडण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.







