शेडाव नाक्यावर धुळीचे साम्राज्य

वाहन चालकांसह स्थानिक नागरिक त्रस्त

| महाड | वार्ताहर |

महाड शहराजवळ गाळ काढण्याच्या कामाला वेग आला असून, हा गाळ काढताना मात्र रस्त्यावरून ये-जा करणार्‍या वाहन चालकांचा आणि पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. उडणार्‍या धुळीने अपघाताची शक्यता असताना याठिकाणी कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.

महाड शहराजवळून जाणार्‍या सावित्री नदीमधील गाळ काढण्याचे काम गेली वर्षे  सुरू आहे. शेडाव नाका परिसरात सावित्री नदीमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढला जात आहे. हा गाळ शेजारी असलेल्या म्हाडाच्या मोकळ्या जागेमध्ये साठवला जात आहे. गेली दोन महिने यांत्रिक साधनांच्या आधारे गाळ काढला जात असून, अवजड वाहनांच्या साह्याने हा गाळ नदीतून या मोकळ्या जागेमध्ये वाहून आणला जात आहे. अवजड डंपरसारख्या वाहनांच्या वर्दळीमुळे शेडाव नाका ते नवेनगर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

ज्या ठिकाणी हा गाळ टाकला जात आहे त्या ठिकाणी डंपरची सातत्याने सुरू आहे हे डंपर वेगाने जात असून, या वेगाने रस्त्यावरील साचलेली धूळ हवेत उडत आहे. यामुळे मागून येणार्‍या दुचाकी आणि चार चाकी वाहनांना समोरील काही दिसून येत नाही. काही किरकोळ अपघातदेखील याठिकाणी झालेले आहेत. या ठिकाणी कोणतीही सुरक्षित यंत्रणा कार्यरत नसल्याने रस्त्यावर येणार्‍या डंपरना मार्ग दाखवणे अथवा रस्त्यावर पाणी टाकण्याची जबाबदारी कोणीही घेतलेले नाही.

Exit mobile version