| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी सकाळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तालुका शाखा माणगाव तसेच शिक्षक समन्वय समितीच्या संयुक्त विद्यमाने जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर करत प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे यांनी केले. आंदोलनात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन करत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रकाश टाकला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. विशेषतः केंद्र शासनाच्या पीएफआरडीए संबंधित धोरणांचा निषेध करत ते रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली. यावेळी शिक्षक समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर, खजिनदार बुद्धकोश पवार, राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजेश्वर दाढेल यांच्यासह शाम राठोड, खोपकर, तुषार सुर्वे, बावधने, तृप्ती पवार, भरत उतेकर, राजेश जाधव, जयेश कदम, प्रमिला मांगडे, सुविता ऐनकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.







