रोपवाटिकांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई येथील युनायटेड वे ही संस्था गेली अनेक वर्षे कार्य करीत आहे. पाथरज ग्रामपंचायत मधील डोंगरपाडा येथील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन केले. या महिलांनी रोपवाटिकांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.

युनायटेड वे या संस्थेकडून कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि शैक्षणिक तसेच जल या विषयांवर काम करणारे या संस्थेने अनेकांना रोजगार दिला आहे. या संस्थेने पाथरज ग्रामपंचायतीमधील डोंगरपाडा गावातील महिलांना जनजागृती निर्माण केली. त्या माध्यमातून बचत गटाची निर्मिती केली. युनायटेड वे कडून प्रेरणा बचत गट स्थापन करून महिलांना रोपवाटिका निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी तळेगाव येथे पाठवले होते. रोपवाटिका निर्माण करण्याचे तीन दिवसांचे प्रशिक्षण प्रेरणा महिला बचत गटांमधील अनसूया करडुळे, छाया लोहकरे, आरती लोहकरे, अपर्णा लोहकरे, फसाबाई बुरुड, गुलाब तिटकारे, भारती तिटकारे, दुर्गा लोहकरे, पुष्पा बुरुड आणि दया लोहकरे यांनी घेतले.

प्रशिक्षण घेऊन आलेल्या महिलांना डोंगरपाडा येथे आल्यावर कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर प्रेरणा महिला बचत गटाच्या महिलांनी आपल्या शेत जमिनीवर पाण्याची व्यवस्था करून आंब्याच्या बागेत रोपवाटिका निर्माण केली. त्यासाठी ग्रीन नेट वापरून त्यांच्या आधारे बंदिस्त जागा तयार केली. त्या जागेचा फायदा तापमान नियंत्रित करण्यास मदत झाली. पुढे त्या रोपवाटिकेमध्ये तळेगाव येथे जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाचा फायदा घेत लहान रोपे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या त्यांच्या रोपवाटिकेत 500 हून अधिक रोपे तयार असून, त्या ठिकाणी किमान 10 हजार रोपे निर्मितीचे या बचत गटाने ठेवले आहे.

Exit mobile version