ताम्हिणी घाटरस्त्याची रोजगार हमी मंत्र्यांकडून पाहणी

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा तसेच निसर्ग सौंदर्यासाठी देशभर प्रसिद्ध असलेला ताम्हिणी घाट मार्ग पावसाळ्यात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतूक विस्कळीत होणे अशा गंभीर समस्यांना वारंवार सामोरे जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज ताम्हिणी घाट परिसराला प्रत्यक्ष भेट देत रस्त्याच्या सद्यस्थितीची आणि सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांची सविस्तर पाहणी केली.

पाहणी दरम्यान मंत्री गोगावले यांनी घाटातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे खचलेले रस्ते, दरडी कोसळण्याची शक्यता असलेले भाग, वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी ठिकाणे तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची त्यांनी सखोल समीक्षा केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना अपघातप्रवण ठिकाणी तातडीने संरक्षक उपाययोजना राबविण्याचे, आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ सदैव सज्ज ठेवण्याचे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ताम्हिणी घाट हा पुणे, रायगड आणि कोकणातील पर्यटन तसेच दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने रस्ता शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.

रस्ता पूर्ववत करण्यासाठी शासन आवश्यक ते सर्व निर्णय तातडीने घेईल आणि कामात कोणताही विलंब होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. पाहणी दरम्यान संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यांनी रस्ता दुरुस्तीची सद्यस्थिती, दरडी हटविण्याचे काम, संरक्षण भिंती उभारणे, पाण्याचा निचरा करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाची माहिती मंत्र्यांना दिली. रस्ता लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नागरिक आणि पर्यटकांना पावसाळ्यात घाटमार्गातून प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि धोकादायक ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version