आदिवासी लोकांना बांबूतून रोजगार

गौरी-गणपतीच्या सणाला वस्तूना अधिक मागणी

| नेरळ | वार्ताहर |

कोणत्याही धार्मिक कार्यासाठी आवश्यक असलेल्या बांबूच्या वस्तू आणि खास गौरी गणपती सणाला आवर्जून गरज बनलेल्या वस्तूंची मागणी असते. कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यामध्ये राहणारे बारमाही व्यवसाय म्हणून बांबूच्या पातींपासून वस्तू निर्माण करतात. नेरळ येथील बाजारात बांबूच्या पतींपासून बनवलेल्या वस्तूंसाठी ठाणे जिल्ह्यातील लोक खरेदी करीत असतात.

बांबूच्या पातींपासून बनविल्या जाणाऱ्या टोपल्या, लहान टोपल्या तसेच सूप आणि खेळण्यातील वस्तू बनविल्या जातात. या वस्तू बनविणाऱ्या आदिवासी लोकांच्या वस्तूंना सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. सर्वात मोठा सण असलेल्या गौरी-गणपतीच्या सणाला तर गौरी आवाहनाला नवीन टोपली आणि सूप आवश्यक असतात. त्या टोपली आणि सुपांची निर्मिती हे लोक करीत असतात. पोशीर, उंबरवाडी, चिंचवाडी, वारे आणि कळंब येथील आदिवासी या वस्तूंची निर्मिती करीत असतात. या वाड्यांतील प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते. त्यासाठी जंगली भागातील बांबू विकत आणून आपली कारागिरी सुरु करतात.

गणेशोत्सव काळात या तिन्ही गावातील महिला या नेरळ तसेच बदलापूर, कल्याण आणि कर्जत येथील बाजारात टोपली आणि सुपे विकण्यासाठी येत असतात. तर पुरुष मंडळी घरात साहित्य बनविण्यात व्यस्त असतात. यातून त्याना आर्थिक स्थिरता तसेच हक्काचा रोजगार मिळत आहे.

व्यवसायातून स्थिरता
कर्जत तालुक्यातील सहा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांना बांबूच्या कारागिरीतून निर्माण होणाऱ्या वस्तू यांचा आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी मदत होत आहे. त्या सहा वाड्यांमधील आदिवासी लोकांनाच उदरनिर्वाहाचा हा कायमचा व्यवसाय आहे.
वस्तूंचे दर
गौरींसाठी लागणारी मोठी टोपली- 200, सूपं - 200
तांदूळ निवडण्यास वापरली जाणारी सूपं- 120
लक्ष्मी पूजनसाठी केरसुणी- 70 ते 100
Exit mobile version