शेतीकामातून मिळणार आर्थिक बळ
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये भात लावणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात लावणीच्या कामाची लगबग सुरु झाली आहे. डोंगरदर्यात राहणार्या आदिवासी समाजाला लावणीच्या कामातून आता रोजगार मिळू लागला आहे. जूलै अखेरपर्यंत त्यांना काम मिळणार असल्याने आर्थिक बळ त्यांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
आदिवासी समाजातील काही मंडळी पाऊस संपल्यावर वीटभट्टीवर कामाला जातात. त्यातून त्यांचा कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्यानंतर पावसाळ्यात शेतीची कामे करतात, तर काहीजण डोंगरावर उताराच्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवित असतात. रायगड जिल्ह्यामध्ये 98 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात लागवड केली जाणार आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने सुरुवात केली आहे. शेतकरी आता लावणीच्या कामांमध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. लावणीची कामे करण्यासाठी मजूरकर म्हणून आदिवासी पुरुष व महिला काम करू लागले आहेत.
मोठया शेतकर्यांकडून त्यांना मागणी वाढली आहे. महिनाभर हे काम राहण्याची शक्यता आहे. यातून आदिवासी समाजातील शेकडो बेरोजगारांना रोजगाराचे साधन खुले होणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतांमध्ये आदिवासी समाज लावणीची कामे करत आहे. भात लावणीच्या ठिकाणी वेगवेगळया भागातून त्यांना गाडीतून आणणे. संध्याकाळी लावणीची कामे पुर्ण झाल्यावर त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे काम शेतकर्यांकडून केले जाते.
भात लागवडीला सुरुवात झाली आहे. रोपे लावणीसाठी कामगार म्हणून आदिवासी समाजातील पुरुष, स्त्रियांना मागणी आहे. वेगवेगळ्या भागातून ही मंडळी लावणीच्या कामासाठी येतात. त्यांच्या कामाचा योग्य मोबदलाही दिला जातो.
सतिश म्हात्रे, शेतकरी