बांबूच्या बंध विक्रीतून रोजगार

आदिवासी कुटुंबियांचे उपजिविकेच साधन

। पालघर । प्रतिनिधी ।

शेतकर्‍यांसाठी भाताचे भारे बांधण्यासाठी लागणारे बंध (बांबूपासून तयार केलेला दोर) विक्रीतून अनेक आदिवासी कुटुंबियांना दोन महिन्यांसाठी चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील चारशेहून अधिक कुटुंबांचे उपजिविकेचे हे एक साधन बनले आहे.

गेले दोन वर्षे भात कापणी हंगामातच सर्वत्र करोनाचे सावट पसरल्याने येथील आदिवासींना बंध विक्रीचा व्यवसाय करता आलेला नव्हता. तर, गत वर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर भाताचे नुकसान केल्याने अनेक शेतकर्‍यांनी बंधचा वापर केला नव्हता. या वर्षी मात्र भात पिकाचे चांगले उत्पन्न आल्याने भारे बांधण्यासाठी मोठ्या संख्येने बंधांची मागणी वाढली आहे. बहुतांश शेतकरी 500 ते 1 हजार बंध खरेदी करताना शेतकरी दिसत आहेत. यामुळे वाडा, विक्रमगड तालुक्यातील शेकडो आदिवासींना या वर्षी चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

बंध बनविण्याची पद्धत
दोन ते तीन दिवसांपूर्वीच तोडलेल्या ओल्या बांबूचे 5 ते 6 फूट लांबीच्या अंतरावर तुकडे केले जातात. हे तुकडे दगडावर ठेचून 3 ते 4 दिवस सुकविले जातात आणि शंभर बंधांचा गठ्ठा करुन प्रती शेकडा दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत बाजारपेठेत विकायला आणले जातात. काही दलाल या बंधची एकदमच खरेदी करून बाजारपेठेत दिवसभर विक्रीसाठी बसत असतात.
महिलांच्या हाताला काम
वाडा तालुक्यातील परळी, ओगदा, उज्जेनी, आखाडा या भागातील शेकडो आदिवासी महिला व पुरुष बंध विक्रीचा दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या दोन महिन्यांत हा व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून येथील अनेकांना चांगला रोजगार मिळत असतो. विशेषतः महिलांच्या हाताला काम मिळाल्याने महिलांकडून अधिक मेहनत केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.

सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्या शेतकरी भात कापणी करत असतो. कापलेले भात बांधण्यासाठी बांबू पासून बनवलेले बंधाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. यामुळे या दोन महिन्यात आम्हाला रोजगार मिळतो. तसेच, या व्यवसायातून मिळणार्‍या पैशातून आमची चूल पेटत असते.

महादू भुजाडे,
बंध विक्रेता, वाडा
Exit mobile version