आरोग्यवर्धक रानभाज्या विक्रीतून रोजगार

। सुधागड-पाली । वार्ताहर ।

श्रावण महिन्यात अनेक सणवार असतात. शिवाय पुष्कळ जण या महिन्यात मांसाहार करत नाहीत. जिल्ह्यातील रानावनात व रानमाळावर विविध रानभाज्या याच श्रावणात फुलतात. या विशेष हंगामात मिळणार्‍या आरोग्यवर्धक रानभाज्यांचे सेवन केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. केवळ श्रावणात फुलणार्‍या या वनस्पतींचे गुणधर्म औषधी असल्याने त्या आवर्जून खाल्ल्ल्या जातात. शिवाय दिवसानुसार प्रत्येक भाजीला महत्व असून त्याप्रकारे त्या केल्या जातात. या रानभाज्या बाजारात उपलब्ध होत आहेत. आदिवासी महिलांना या रानभाज्या विकून चांगला रोजगारदेखील मिळतो.

कौला: कौलाच्या पानांची भाजी करतात. श्रावण शुक्रवारी जिवतीच्या फुलांची भाजी, श्रावण शनिवारी राजगिरा, कुर्डू, कुळी, टाकळा आणि आम्लीच्या पानांची एकत्रित पंचभेळी भाजी करतात. ऋषीपंचमीला बर्‍याच रानभाज्यांची मिळून एक मिसळ भाजी करतात.

कपाळफोडी: कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. जीर्ण आमवातामध्ये पानांची भाजी खाण्याची प्रथा आहे. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणे, मलाविरोध सारख्या विकारात कपाळफोडीच्या भाजीने आराम मिळतो.

भारंग: ही भाजी जिल्ह्यात मुबलक मिळत आहे. ही भाजी उगवल्यानंतर कोवळी असताना तोडली जाते. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. काहीजण वाल टाकून ही भाजी करतात.

कंटोली: कंटोली किंवा करटोली ही भाजी कारल्यासारखी दिसते. कारल्याची भाजी करतात तशीच या फळाची भाजी केली जाते. जिल्ह्यातील सर्व बाजारात आदिवासी महिला ही भाजी विक्रीसाठी घेऊन येत आहेत.

कुरडूची भाजी: कुरडूची कोवळी पाने शिजवून त्याची भाजी करतात. दमेकरी जुनाट खोकला, वृद्ध माणसांचा कफ विकार यात ही भाजी उपयुक्त आहे. कुरडूची पालेभाजीसुद्धा लघवी साफ करायला उपयोगी आहे.

कुलुची भाजी: फोडशी किंवा कुलु किंवा काल्ला या नावाने हि रानभाजी ओळखली जाते. हि भाजी म्हणजे एक प्रकारचे गवतच असते. हि भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते. पावसाळी भाज्यांप्रमाणे हि चविष्ट असते. हि भाजी शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्रकारात करता येते.

काटेमाठ: काटेमाठच्या कोवळ्या भाज्या आणि कोवळ्या फांद्या भाजीसाठी वापरतात. पावसाळ्यात ओसाड जमिनीवर, रस्त्याच्या कडेला आणि शेतात काटेमाठ ही वनस्पती आढळते.

Exit mobile version