हत्ती गवत लागवडीतून शेतकर्‍यांना रोजगार

मुरुड येथे प्रकल्पाचा शुभारंभ
वर्षाला दोन लाखांची कमाई शक्य

| मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
तालुक्यातील शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासास हातभार लावण्यासाठी वाणदे या गावी मुरूड स्वप्नपूर्ती प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून हत्ती गवताची लागवड करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. वर्षभरात 40 टन गवत दिल्यास दोन लाख रुपये प्रत्येक शेतकरी कमावू शकणार आहे. तालुक्यात कंपनीचे 15 हजार सभासदांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत सात हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे.

दरम्यान, एमसीएल अंतर्गत शिघ्रे येथील उद्योजक अमोल काशीनाथ पाटील यांच्या जागेत एमकोल या सीएनजी प्रदूषणमुक्त गॅससाठी अत्यंत उपयुक्त ठरणार्‍या हत्ती गवत लागवडीचा शुभारंभ कंपनीचे प्राईम बीडीए शैलेश म्हात्रे आणि मुरूड तालुका शेतकरी कामगार पक्षाचे मुरूड तालुका चिटणीस अजित कासार यांच्या हस्ते तथा कंपनीचे मुख्य सीईओ श्रावण माने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी शैलेश म्हात्रे म्हणाले की, मुरूड तालुक्यात कंपनीचे 15 हजार सभासदांचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत सात हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, सभासदांच्या मुला-मुलींना नोकर्‍या, शिक्षण, आरोग्य, क्रीडा क्षेत्रालादेखील सहकार्य केले जाणार आहे. कंपनीचे संचालक तुकाराम दामोदर पाटील यांनी पहिली सभा वाणदे लावून हा डेमो प्रकल्प तुकाराम पाटील यांच्यातर्फे उद्योजक अमोल पाटील यांना मिळाल्याची माहिती शैलेश म्हात्रे यांनी दिली.

शेकाप मुरूड तालुका चिटणीस अजित कासार म्हणाले की, या कंपनीच्या माध्यमातून निर्माण होणारे प्रदूषणमुक्त उत्पादन मानवासाठी अत्यंत उपयुक्त आणि शेतकर्‍यांना मोठा आर्थिक मदतीचा हात देणारे ठरणार आहे. संचालक तुकाराम पाटील म्हणाले की, कंपनीच्या माध्यमातून नोकर्‍या, मुरूडमध्ये सीएसआर फंडातून सुसज्ज हॉस्पिटल, भव्य क्रीडांगण, कॉलेज आदी सुविधाही निर्माण करण्यात येणार आहेत. हरित आणि प्रदूषणमुक्त मुरूडसाठी आमचे सर्वांचे खास प्रयत्न आहेत.
याप्रसंगी कंपनीचे सेक्रेटरी नामदेव भोईर, संचालक रवींद्र पोतनीस, संचालक अरविंद भोपी, संचालक तुकाराम पाटील, अजित कासार, दिलीप केने, प्रमोद गुरव, कलावती पाटील, जयंत कासार, अमोल पाटील, सखाराम गायकर, मुंबईकर गुरुजी, दामोदर वारगे, ज्ञानेश फलेभाई, अमित ठाकूर, कृष्णा मिसाळ, घनश्याम श्रीवर्धनकर, दत्ता माळी, मनोहर गुरव, शिवानी जगताप, राजश्री गायकर, चंद्रकांत बेडेकर, कल्पेश बुल्लू, इंदिरा ठाकूर असे अनेक ग्रामपंचायत चॅनल पार्टनर आणि शेतकरी उपस्थित होते.

शेतमालाला येणार भाव
तालुक्यात कंपनीने या प्रकल्पासाठी 12 एकर जागा घेतली असून, हत्ती गवत, पालापाचोळा, पेंडा, तूस, झाप आदी कच्चा माल कंपनीच्या सभासद शेतकर्‍यांकडून खरेदी केला जाणार असून, येथेच प्रोसेस केली जाणार आहे. यातून प्रदूषणमुक्त सीएनजी कुकिंग गॅस, कोळसा तयार करून आवश्यक उद्योगात विकला जाणार आहे. तालुका स्तरावर देशभरात पाच हजार ठिकाणी अशी युनिट स्थापन करण्यात येणार आहेत. वर्षभरात 40 टन गवत दिल्यास दोन लाख रुपये प्रत्येक शेतकरी कमावू शकणार आहे.

Exit mobile version