रानभाज्या विक्रीतून आदिवासींना रोजगार

| सुकेळी | वार्ताहर |

सुकेळी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकांची वस्ती आहे. दररोज अतिशय मेहनत करुन व प्रामाणिकपणे आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत. सद्यःस्थितीत गावठी भाज्यांमुळे येथील आदिवासी बांधवांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळत असल्याने या भागातील आदिवासी बांधवांच्या विशेषतः महिलांच्या चेहर्‍यावर एक आनंद दिसून येत आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून जंगली भागात मिळणार्‍या रानटी भाज्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विक्रीस येत होत्या. परंतु, श्रावण महिन्यात पिकविल्या जाणार्‍या गावठी भाज्या तयार होऊन त्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या आहेत. सुकेळी परिसरातील आदिवासी बांधवांनीदेखील दोन ते तीन महिने मेहनत घेऊन गावठी भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेत त्या भाज्या विक्रीसाठी नागोठणे, कोलाड, खांब तसेच गावोगावी घेऊन जात आहेत. तर, काही महिला या मुंबई-गोवा महामार्गालगत सुकेळी या ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसत आहेत. या भाज्या खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या गावठी भाज्यांमध्ये काकडी, वांगी, मिरची, भेंडी, शिराळा, घोसाळे, कारले, दुधी, भोपळा, माठ, अळुची पाने आदी भाज्यांचा समावेश आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे या भाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळणार आहे.

Exit mobile version