तटकरेंच्या सभेची जोरदार चर्चा अन्‌ रिकाम्या खुर्च्या

। पेण । प्रतिनिधी ।

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. दिल्ली दरबारी आपलं वजन वापरुन खासदार सुनील तटकरे यांनी भाजपच्या नाकावर टिचून तिकीट आणले आणि जिल्ह्यात बैठका, सभा सुरु झाल्या. बुधवारी (दि.3) पेण तालुक्यातील हमरापूर येथे सभा होती. महायुतीच्या सभेसाठी हजारो कार्यकर्ते येणार असल्याचे अपेक्षित धरण्यात आले होते. तशी आसन व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त 47 च्या आसपास खुर्च्या भरल्या. पहिल्या तीन रांगा सोडून सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या. ज्या रांगा भरल्या होत्या, त्यामध्येसुद्धा अयाराम-गयारामच जास्त होते. व्यासपीठावर गर्दी अधिक, पण कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्यानं सभे ठिकाणी उपस्थित नेत्यांचे हसं झाले आहे.

हमरापूर विभाग म्हटल्यानंतर आमदार रवी पाटील आणि मा. विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांचा बालेकिल्ला, त्यामुळे विक्रमी गर्दी होणार अशी राष्ट्रवादीच्या हौशा-नवशा बोलघेवड्या तालुक्याच्या पुढाऱ्यांना वाटली होती. परंतु, खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमरापूर येथील सभेला आमदार रवी शेठ पाटील यांना मुद्दाम डावल्याचे समजते, त्यामुळेच अगोदरच नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनी या सभेला अक्षरशः पाठ फिरवली. व्यासपीठावरचे चित्र पाहिल्यावर महायुतीची सभा आहे की, एखाद्या ग्रामपंचायत वॉर्डची सभा आहे, हेच समजत नव्हते. व्यासपीठावर सुनील तटकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या बगलबच्चांव्यतिरिक्त कोणीच दिसत नव्हते. तालुका अध्यक्ष दयानंद भगत ज्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नवख्या महेंद्र घरत यांनी पाणीपत केले, दुसरे विकास म्हात्रे ज्या पार्टीत जातील, त्या पार्टीमध्ये भकास होईल एवढे निश्चित, अशीच चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. आजपर्यंत कोणताच असा पक्ष राहिला नाही, ज्यामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला नसेल, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तिसऱ्या म्हणजे, महिला तालुकाध्यक्ष चैत्राली पाटील, ज्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या मुलाचे डिपॉझिट वाचवता आले नाही. त्यानंतर नरेंद्र ठाकूर ज्यांची कीर्ती पूर्ण तालुक्यामध्ये आहे. असे व्यासपीठावर दांडगा जनसंपर्क असणारे कार्यकर्ते उपस्थित होते. तर, व्यासपीठाच्या समोर पहिल्या तीन रांगा वगळता सर्व खुर्च्यांच्या रांगा रिकाम्याच रिकाम्या होत्या. आणि, ज्या काही तीन रांगा भरलेल्या होत्या, त्यामध्ये शहरातील मंडळीच जास्त दिसत होती.

खरंच मनोमिलन झाले?
एकंदरीत काय तर, जरी नेते मंडळी म्हणत असतील, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमार; पण खरी परिस्थिती ही खूपच वेगळी आहे. कारण, हमरापूर हा विभाग भाजपचे आमदार स्वतःचे समजत असतील, तर स्वर्गीय प्रमोद पाटील यांना मानणारे लालबावट्याचे सेवक आजही लालबावटा अभिमानाने तिथे फडकवत आहेत. त्यामुळे पेण तालुक्यातही पहिल्याच सभेत त्यांनी दाखवून दिले, जनता भ्रष्टाचाऱ्यांच्या बरोबर नसून त्यांच्या विरोधात आहेत.
दोन्ही पाटील अनुपस्थित
लोकसभेसाठी खासदारकीचे तिकीट मिळेल या आशेने पक्ष बदलून गेलेले धैर्यशील पाटील यांना शेवटी हाती काहीच लागले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आ. रवीशेठ पाटील यांना या सभेला मुद्दामून डावलल्याची चर्चा असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आधीच नाराजी होती. दरम्यान, नाराज असलेले दोन्ही नेत्यांनीसुद्धा या सभेकडे पाठ फिरवल्याने चर्चेला उधाण आले असून, कार्यकर्तेदेखील संभ्रमात पडले आहेत.
Exit mobile version