शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण

वणी, चेराठी येथील शेतकऱ्यांनी घेतली खासदारांची भेट

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|

अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल कंपनीकडून पेण तालुक्यात महावितरण कंपनीचे उच्च दाब वाहिनी टाकण्याचे काम सुरु केेले आहे. त्यासाठी मोठे टॉवर उभारले जात आहेत. पेण तालुक्यातील वणी आणि चेराठी येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरून या वाहिनीचे अतिक्रमण सुरु झाले आहे. या विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन तटकरे यांनी आश्वासन दिले.

उसर येथ गेल कंपनीमध्ये करोडो रुपयांचा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल कंपनीकडून पेण तालुक्यापर्यंत वणी आणि चेराठीपर्यंत असंख्य महावितरण कंपनीचे उच्च दाब वाहिनीचे टॉवर उभारण्यास सुरुवात केली आहे. अलिबाग तालुक्यातील अनेक भागात हे टॉवर उभे केले आहेत. पेण तालुक्यातील वणी आणि चेराठी परिसरात शंभरहून अधिक शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन आहे. या पिकत्या जमिनीमधून टॉवरसह उच्च दाब विद्यूत वाहिनीची हालचाल सुरु झाल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचली. या कामाबाबत शेतकरी व ग्रामस्थांना कोणतीही पूर्व सुचना देण्यात आली नाही. जनसुनावणी चर्चा व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण न करता, कंपनीकडून मनमानी पद्धतीने काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या शेत जमिनीवर शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. या जमिनीमध्ये भातशेतीसह इतर शेती व्यवसाय केला जात आहे. उच्च दाब विद्यूत वाहिनीमुळे भविष्यात शेतीच्या वापरावर आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भिती व्यक्त करण्यात आली. या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र, विद्यूतवाहिनी शेत जमीनीतून न नेता पर्यायी मार्गाने नेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित कऱण्यात आली. याबैठकीत ग्रामस्थ, शेतकरी व गेल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असा विश्वास तटकरे यांनी दिला.

Exit mobile version