गुरचरण जागेवर धनदांडग्यांचे अतिक्रमण

थळ-चाळमळा येथील स्थानिकांनी उठवला आवाज

| अलिबाग | प्रतिनिधी |

थळमध्ये पूर्वांपार वहिवाटीसाठी वापरात असलेल्या चाळमळा येथील गुरचरण जागेवर प्रशासनाने कुंपण घातल्याने आपला रस्ताच बंद झाल्याची तक्रार स्थनिकांनी केली आहे. या जागेवर धनदांडग्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून त्यावर अतिक्रमण करून जागा बळकविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, असाही ग्रामस्थांनी आरोप केला आहे. दरम्यान आ. जयंत पाटील यांना याबाबत चाळमळा येथील ग्रामस्थांनी निवेदन दिले असून आ. पाटील यांनी प्रशासनाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.

अलिबाग तालुक्यातील थळ येथील चाळमळा येथे सर्व्हे नंबर 345/1 मध्ये सुमारे साडेपाच एकर गुरचरण जागा आहे. या जागेमधून पिढ्यानंपिढ्या स्थानिकांची वहिवाट आहे. मात्र थळ ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करीत या जागेवर तारेचे कुंपण घातले. त्याचा फटका स्थानिकांना बसला आपल्याला बसला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याच तारेच्या कुंपणाच्या आत येथील धनदांडग्याने झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे पूर्वांपार वहिवाटीचा रस्ताच बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा विरोध करूनही स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. गुरचरण जागेत धनदांडग्यांनी अतिक्रमण केल्याने स्थानिकांना ये – जा करण्यास मज्जाव करून ही जमीन बंगलेवाल्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तारेचे कुंपण काढून वहिवाटीचा रस्ता मोकळा करावा.आणि अनधिकृत झाडे काढण्यात यावी अशी मागणी चाळमळा येथील ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत त्यांनी आ. जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे.

चाळमळा येथील गुरचरण जागेबाबतचा प्रश्नाबाबत तलाठी नाईक यांना पहाणी करून अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

विक्रम पाटील, तहसीलदार, अलिबाग
Exit mobile version