चाळमळा कोळीवाडा येथील पाणी पुरवठयाबाबत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना निवेदन
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अडीच वर्षांपूर्वी मोठमोठी आश्वासने देत जनतेची दिशाभूल करून निवडून आलेल्या अलिबागच्या आमदारांना साधा त्यांच्याच गावातील पाण्याचा प्रश्न सोडवता आलेला नाही. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी आता आपली तहान भागविण्यासाठी थेट केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांना साकडे घातले आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी नुकतेच कपिल पाटील यांना दिले आहे.
अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दितील चाळमळा कोळीवाडा येथे पाणी पुरवठा अनेक वर्ष थळ ग्रामपंचायतीला पूर्ण करता आला नाही. त्यामुळे शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा केला गेला आहे. थळ गावचे रहिवासी असणारे आणि आधीच्या सरकारच्या काळात झालेल्या प्रत्येक विकास कामाचे फक्त श्रेय लाटणाऱ्या आमदाराचा खोटा बुरखा गावातीलच पाणी टंचाई दूर करू न शकल्याने टरा टरा फाटला आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या आमदारांच्या गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्रीय मंत्र्याला ग्रामस्थांना साकडे घालावे लागते यासारखे दुर्दैव नाही अशी चर्चा अलिबाग तालुक्यात होत आहे.
नुकत्याच अलिबाग दौऱ्यावर येवून गेलेल्या केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना थळ ग्रामस्थांनी निवेदन देत ग्रामस्थांनी आपली पाणी टंचाई सोडविण्यासाठी साकडे घातले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आपले थळ चाळमळा येथील कोळीबांधव पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत हे दुर्दैव आहे. पंतप्रधान यांच्या “हर घर जल” या योजनेला हरताळ फासत वरिल ठिकाणा व्यतिरिक्त अलिबाग तालुक्यातील किहीम, रेवस, बोडणी या ठिकाणीही पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू असते. त्यामुळे याबाबत संबंधिताना वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात आली आहे.
देश अमृतमहोत्सव साजरा करीत आहे तेव्हा आपण अमृतासारखे असणारे पाणी येथील नागरिकांना देण्याबाबत पंतप्रधान यांचे हर घर जल” हे सत्य प्रत्यक्षात साकार करावे अशी विनंती केली आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड महेश मोहिते यांच्या सह ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष जगदीश घरत, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत दांडेकर आदी उपस्थित होते.