| अलिबाग | प्रतिनिधी |
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘निक्षय मित्र’ संकल्पनेत सहभागी होत आदर्श पतसंस्थेने सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी 25 क्षयरुग्णांना सहा महिन्यांसाठी दत्तक घेतले आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित क्षयरुग्णांना सकस आहारासाठी आवश्यक कोरडे धान्य व पोषण साहित्याचे वितरण करण्यात आले. क्षयरोगावरील उपचारांसोबत पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असून त्यामुळे रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. जिल्ह्यात दरवर्षी सुमारे 4,500 क्षयरुग्ण उपचार घेत असून त्यांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत समाजातील विविध संस्था, उद्योग आणि नागरिकांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येऊन क्षयरुग्णांना पोषण आहार व आवश्यक मदत करावी, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.







