दिवील जंगम दफनभूमीत अतिक्रमण

प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशारा

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

तालुक्यातील दिवील येथील जंगम समाजाच्या दफनभूमीमध्ये अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींवर कोणताही विचार प्रशासनाकडून झाला नसताना आणखी या दफनभूमीमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन झाल्याने याविरोधात मंगेश जंगम यांनी दि.14 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुका लांबणीवर पडल्याने गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक असतानाही स्थानिक राजकीय प्रभावाने तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 61 गुंठे मिळकतीवर ‘महाराष्ट्र शासन स्मशानभुमी’ असा शेरा पडला आहे. परंतु, या जमिनीवर पूर्वापार जंगम समाजातील मृत व्यक्तींचे दफन केले जात आहे. गेल्या काही वर्षांपासून या जमिनीवर अनधिकृत बांधकामांद्वारे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या पत्रव्यवहारानंतरही कार्यवाही झाली नसल्याचे जंगम समाजाचे म्हणणे आहे. या अनधिकृत बांधकामांकडे पंचायत समिती प्रशासन व ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच, याच 61 गुंठे जमिनीवर अलिकडेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन झाले असल्याचे निदर्शनास आणून देत या शासकीय दफनभूमीतील अतिक्रमणे हटवून नियोजित प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम होणार नाही, याची लेखी ग्वाही मिळण्यासाठी मंगेश जंगम यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर दि. 14 ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

या पत्राच्या प्रती जंगम समाजाकडून मुख्यमंत्री महोदयांपासून पोलादपूर पोलीस ठाणे, पंचायत समिती तसेच तहसिलदार, आमदार, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविकासमंत्री, खासदार, डीवायएसपी, प्रांताधिकारी आणि दिवील ग्रामसेवक यांना पाठविण्यात आले आहे.

Exit mobile version