सहा जणांवर दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून झाडांची अनधिकृत तोड केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवेआगर येथील ग्रामपंचायतीच्या नावे असलेल्या सरकारी गट नंबर 796/1/1 मधील 53.11.40 हेक्टर आर क्षेत्रफळाच्या जागेवर आरोपींनी अनधिकृतपणे कब्जा केला. आरोपींनी या शासकीय जमिनीवर ठिकठिकाणी दोऱ्या बांधून प्लॉटिंग केले, तसेच या जागेवर असलेल्या केतकीच्या व जंगली झाडांची बेकायदेशीरपणे तोडफोड करून मोठे नुकसान केले. याप्रकरणी चंद्रकांत नाग्या गोवारी (49, व्यवसाय- नोकरी, रा. दिघी, ता. श्रीवर्धन) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.अल्केश पाते, मयूर पाते, सुशांत येसावरे, संतोष पाते, योगेश पाते आणि अमोल बांद्रे (सर्व रा. दिवेआगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना जून 2026 मध्ये घडली असून, 29 ऑगस्ट 2026 रोजी रात्री याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, आरोपींना बीएनएसएस 35(3) ची नोटीस बजावण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
