निडीच्या खाडीत कांदळवनावर घाला

पाण्याचे नैसर्गिक प्रवाह दगड टाकून बंद

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील निडी खाडी परिसरात कांदळवन नष्ट करण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने स्थानिक नागरिक, मच्छिमार आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नैसर्गिक भरती-ओहोटीचा जलप्रवाह मुद्दाम अडवून कांदळवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

मुरुड तालुक्यातील निडी गावालगत असलेल्या शासकीय बंधाऱ्याजवळ काही अज्ञात व्यक्तींनी समुद्राच्या विरुद्ध दिशेने मोठमोठे दगड टाकून जलप्रवाह रोखल्याचे समोर आले आहे. परिणामी, कांदळवनाला आवश्यक असलेला पाण्याचा पुरवठा खंडित झाला असून, हे संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्र कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भात स्थानिक रहिवासी प्रकाश चंद्रकांत तांबडे यांनी ग्रुप ग्रामपंचायत साळाव, रायगड जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या मते, गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, येत्या पावसाळ्यात मत्स्यप्रजनन आणि मासेमारी व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणात पर्यावरणीय गुन्ह्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कांदळवन संवर्धन आणि जैवविविधता रक्षणाच्या दृष्टीने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, खाडीतील नैसर्गिक जलप्रवाह अडवल्यास कांदळवनाची मुळे नष्ट होतात, ज्याचा थेट परिणाम माशांच्या प्रजननावर, जैवविविधतेवर आणि किनारी संरक्षणावर होतो. त्यामुळे हा प्रकार केवळ स्थानिक समस्या नसून, संपूर्ण पर्यावरणीय संतुलनासाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. तक्रारदारांनी बंधाऱ्यावरील अवैध दगड तात्काळ हटवून जलप्रवाह पूर्ववत करण्याची, दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर वन विभाग, पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निडीतील हा प्रकार स्वतंत्र नसून, रेवदंडा आणि चौल परिसरातही अशाच प्रकारे कांदळवनांवर अतिक्रमण आणि नासधूस होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष कारवाई करून किनारी पर्यावरणाचे रक्षण करावे, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे. कांदळवन वाचवले गेले पाहिजे, खाडीचा नैसर्गिक प्रवाह मोकळा केला पाहिजे आणि पर्यावरणाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Exit mobile version