मुरूडमधील संपाला पूर्णविराम

। मुरूड । वार्ताहर ।
राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेला एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर मुरूड तालुक्यात पूर्णविराम देण्यात आला आहे. हा संप वरिष्ठांच्या मध्यस्थीने संपुष्टात आला असून संपात सहभागी झालेल्या कर्मचारी वृंदांवर कोणतीही कार्यवाही होणार नसल्याचे आश्‍वासन विभागीय वाहतूक अधिकारी मनीषा पाटील यांनी दिले आहे.
रायगड विभाग नियंत्रक कार्यालयाकडून मुरुड आगारातील एसटी कर्मचारी वृंदासोबत चर्चा करण्यासाठी विभागीय वाहतूक अधिकारी मनीषा पाटील व सहायक वाहतूक अधीक्षक स्नेहल सरडे यांनी संप सुरू झाल्यापासून तिसर्‍या दिवशी प्रत्यक्ष कर्मचारी यांची भेट घेतली. याप्रसंगी राज्य शासन कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यातची जी प्रमुख मागणी आहे ती विभागीय कार्यलयाकडून स्तरापर्यंत पोहचवली जाणार असून कर्मचारी वर्गाने समजूतदारपणे भूमिका घेऊन आपला संप मिटवावा व वाहतूक पुर्वव्रत सुरु करावी, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी मनीषा पाटील यांनी मुरुड कर्मचारी वृंदाना सांगितले कि, रायगड जिल्ह्यातील आठ डेपो सुरु झाले आहेत. आपणही त्यामध्ये समाविष्ट होणे आवश्यक आहे. दिवाळी सण असून प्रवासी वर्गाला त्यांच्या ठिकाणी पोहचवणे, खूप आवश्यक आहे. तेव्हा तातडीने कामावर आवाहन व्हावे. या आवाहनास कर्मचारी वृदांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून मागील दोन दिवसापासून बंद असलेली एसटीची वाहतूक पुन्हा सुरु झाली आहे.यावेळी कर्मचारी वृंदाना आपले आंदोलन हे नियमबाह्य असून कोर्टाने आपले अपील फेटाळले असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे.

Exit mobile version