| रोहा | प्रतिनिधी |
राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. पत्रकारांच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर 2019 रोजी हा कायदा राज्यात अंमलात आला. मात्र, त्यानंतरही राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी न होता ते दिवसेंदिवस वाढतच राहिलेले पहायला मिळत आहे. यामुळे या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी रोहा तालुक्यातील पत्रकारांनी तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन दिले.
नुकतेच पाचोरा येथे पत्रकार संदीप महाजन यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र, पत्रकार हल्ला विरोधी कायद्यांतर्गत याप्रकरणी ही शासनाने कारवाई केली नाही. पाचोरा येथील घटनेमुळे राज्यभरातील सर्वच पत्रकारांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. आज याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांनी या कायद्याची होळी करत अंमलबजावणी करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. रोहा शहरातील सर्व सक्रिय पत्रकारांनी तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी पत्रकार महादेव सरसंबे, महेंद्र मोरे, अमोल पेणकर, जितेंद्र जोशी, नितीश सकपाळ, मारुती फाटक, महेश मोहिते आदी पत्रकार उपस्थित होते.