| पनवेल | वार्ताहर |
महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने एका 24 वर्षीय इंजिनिअर ने चक्क चोरी केल्याची घटना पनवेल मध्ये घडल्याचे समोर आले आहे. चोरी करणाऱ्या 24 वर्षीय इंजिनिअरला पनवेल गुन्हे शाखा कक्ष-2 च्या पथकाने अटक करून गजाआड केले आहे. इंजिनिअरकडून पोलिसांनी 24लाख 87 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश राजाराम वळकुंडे (24) रा. उरण कुंडेगाव, असे पकडलेल्या इंजिनिअरचे नाव आहे.
आकाश उरण मध्ये आपल्या आई आणि बहिणी सोबत राहत होता. सध्या आकाश इलेक्ट्रॉनिक इजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात नवी मुंबई परिसरातील एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे धडे गिरवत होता. मात्र हे धडे गिरवताना आकाशचा निर्णय चुकला आणि आकाश पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सध्या आकाश वळकुंडे हा गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी आकाशाला चोरी प्रकरणी अटक केली आहे.
पनवेल शहराच्या मध्यभागी असलेल्या एका मोबाईलच्या दुकानात आकाशने चोरी केली होती. 19 डिसेंबरच्या पहाटे पनवेल शहराच्या मध्यभागी असलेल्या मोबाईल शॉप मध्ये चोरी करून अज्ञात आरोपीने लाखो रुपयांच्या मोबाईल वर डल्ला मारल्याची घटना 19 डिसेंबरला उघड झाली होती. ही चोरी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या नंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अज्ञात आरोपी विरोधात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. गुन्हा दाखल झाल्या नंतर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल नवी मुंबई पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी यांच्याकडे गेल्या नंतर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण फडतरे , मानसिंग पाटील, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, देसाई, पोलिस कर्मचारी प्रशांत काटकर, अनिल पाटील, निलेश पाटील, इंद्रजीत कानू, लवकुश शिंगाडे, आदिनाथ कुंडे या पोलिस पथकाने तपासाला सुरवात केली. आकाश हा उरण परिसरातील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आकाशला पोलिस पथकाने 21 नोव्हेंबर रोजी पहाटे बेलापूर येथून अटक केली. बेलापूर येथून अटक केल्या नंतर घटनास्थळी आरोपीची तपासणी केली असता आरोपी कडून पोलिसांना मोबाईल मिळाले. हे मोबाईल कोणाचे आहेत, याची चौकशी केल्यानंतर हे मोबाईल चोरीचे असल्याची कबुली आकाशने दिली.
आकाश याची अधिक चौकशी केली असता आकाश हा इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असल्याची माहिती मिळाली हे ऐकून पोलिस देखील थक्क झाले, त्या सोबत ही चोरी का केली याची विचारणा केली असता अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या वर्षाची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्याची माहिती आकाशने पोलिसानी दिली. पोलिसांनी आरोपी कडून लाखो रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.