| पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीत राहणार्या इंजिनिअरींगच्या तिसर्या वर्षात असलेल्या तरुणाने आज मंगळवारी (दि.15) रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने आलेल्या नैराश्येतुन या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या घटनेतील मृत तरुणाचे नाव कुणाल पोपट जाधव (20) असे असून, तो कळंबोलीमधील हंसध्वनी गृहसंकुल सोसायटीत कुटुंबासह राहत होता.
कुणालचे वडील मुंबईतील गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कुणाल नेरुळमधील तेरणा इंजिनिअरींग कॉलेजमध्ये तिसर्या वर्षाचे शिक्षण घेत होता. मागील काही दिवसांपासून कुणालला मायग्रेनचा त्रास होत होता. त्यामुळे त्याच्या मनात सतत आत्महत्या करण्याचे विचार येत होते, याबाबत त्याने आपल्या वडीलांसमोर बोलून सुध्दा दाखवले होते. मात्र, वडिलांनी त्याची समजूत काढली होती. मात्र, मायग्रेनचा त्रास असह्य झाल्याने कुणालने इमारतीच्या सुरक्षारक्षकाकडे टेरेसची चावी मागितली होती. त्यावेळी सुरक्षारक्षकाने चावी दिली नाही. मात्र, सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सुरक्षारक्षक इमारतीच्या टेरेसवर पाणी सोडण्यासाठी गेला असताना, त्याच्या पाठोपाठ कुणाल इमारतीच्या टेरेसवर गेला होता. यावेळी कुणालने सुरक्षारक्षकाची नजर चुकवून इमारतीच्या टेरेसवरुन उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.