भारतीय महिला संघाकडून इंग्लंड पराभूत

जेमिमा रॉड्रिग्स आणि यास्तिका भाटियाची अर्धशतके; पदार्पणात नंदिनीचे 3 बळी

| इंग्लंड | वृत्तसंस्था |

चेम्सफोर्डमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मध्ये भारतीय महिला संघाने इंग्लंडचा 38 धावांनी पराभव केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. हरमनप्रीत कौरला विश्रांती देण्यात आली होती आणि स्मृती मंधाना कर्णधारपद भूषवत होती. भारताने 7 गडी गमावून 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 8 गडी गमावून 150 धावाच करता आल्या. भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने 69 आणि यास्तिका भाटियाने 54 धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या नंदिनी शर्माने 3 बळी घेतले.

नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. लॉरेन बेलने पहिल्याच षटकात स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माला बाद करून भारताची धावसंख्या 7 धावांवर 2 गडी अशी केली. यानंतर दोन वर्षांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या यास्तिका भाटिया आणि जेमिमा रॉड्रिग्सने डाव सावरला.

एप्रिल 2024 नंतर पहिला सामना खेळणाऱ्या यास्तिका भाटियाने आक्रमक फलंदाजी केली. तिने इसी वोंगच्या षटकात 4 चौकारांसह 27 धावा जमवल्या आणि सोफी एसलस्टोनवर षटकारही मारला. यास्तिकाने 31 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. जेमिमा आणि यास्तिकाने तिसऱ्या विकेटसाठी 76 चेंडूंमध्ये 126 धावा जोडून भारताला मजबूत स्थितीत आणले. लॉरेन बेलने इंग्लंडला सुरुवातीची यश मिळवून दिली. मात्र, खराब क्षेत्ररक्षणामुळे भारतीय फलंदाजांना धावा काढण्याची संधी मिळाली.

टिली कॉर्टिन-कोलमॅनच्या थ्रोवर यास्तिका धावबाद झाली, तर जेमिमा चार्ली डीनच्या चेंडूवर बाद झाली. शेवटच्या षटकांमध्ये ऋचा घोष आणि भारती फुलमाळी लवकर बाद झाल्या, पण दीप्ती शर्माच्या 22 धावांच्या खेळीमुळे भारताने मोठी धावसंख्या उभारली. 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि संघाने 37 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर एमी जोन्स आणि हीथर नाइट यांनी 64 धावांची भागीदारी केली. एमी जोन्सने 48 चेंडूत 67 धावा केल्या, पण तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. हीथर नाइट इंग्लंडकडून सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक 310 सामने खेळणारी खेळाडू ठरली.
पदार्पण करणाऱ्या नंदनी शर्माने आपल्या पहिल्याच षटकात 3 विकेट घेतल्या. तिने एमी जोन्स आणि डॅनी गिब्सनला सलग चेंडूंवर शेफाली वर्माकरवी झेलबाद केले. नंदनी हॅट्ट्रिकवर होती, पण चार्ली डीनने पुढचा चेंडू रोखला. यानंतर दोन चेंडूंनी नंदनीने इसी वोंगला बोल्ड करून सामना भारताच्या बाजूने फिरवला. इंग्लंड यानंतर पुनरागमन करू शकले नाही आणि भारताने 38 धावांनी सामना जिंकला.

Exit mobile version