स्व. नमिता नाईक क्रीडा संकुलात 19 जुलैला जिल्हास्तरीय स्पर्धा; विविध वयोगटांतील जलतरणपटूंची रंगणार चुरस
| अलिबाग | प्रतिनिधी ।
अलिबाग येथील स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल येथे रविवार, 19 जुलै 2026 रोजी ॲक्वाटिक असोसिएशन ऑफ रायगड आणि स्व. नमिता नाईक क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नगराध्यक्ष चषक’ जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील युवा जलतरणपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
या स्पर्धेत 6 वर्षांपासून ते 16 वर्षांखालील मुला-मुलींसह खुल्या गटातील महिला आणि पुरुष जलतरणपटू सहभागी होऊ शकणार आहेत. फ्रीस्टाइल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक आणि बटरफ्लाय या चार प्रमुख प्रकारांमध्ये विविध अंतरांच्या स्पर्धा पार पडणार असून, दिवसभर जलतरण तलावात रोमांचक चुरस पाहायला मिळणार आहे.
सर्व स्पर्धकांनी सकाळी 9 वाजेपर्यंत स्पर्धास्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्येक जलतरण प्रकारात सहभागी होण्याची संधी खेळाडूंना उपलब्ध असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे किंवा प्रत्यक्ष स्पर्धास्थळी करता येणार आहे. नोंदणी करताना आधार कार्ड किंवा जन्मदाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, नोंदणी शुल्क आणि सहभागी होणाऱ्या जलतरण प्रकाराची माहिती देणे बंधनकारक आहे.
स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा अक्षया नाईक आणि गटनेते प्रशांत नाईक यांच्या हस्ते होणार असून मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका प्रमुख उपस्थित राहणार आहेत. रायगड जिल्ह्यातील अधिकाधिक जलतरणपटूंनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कौशल्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 8983895307 किंवा 9522035075 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






