कर्णधार बाबर आझमचे आवाहन
| लाहोर | वृत्तसंस्था |
भारत,पाकिस्तान क्रिकेट संघामध्ये होणारा कोणताही सामना सामना नेहमीच प्रतिस्पर्धी संघासाठी रोमांचक आणि चाहत्यांना आनंद देणारा असतो. दोन्ही संघाच्या खेळाडूंवर सारखाच दबाव असतो. कोणता संघ जिंकेल हे या सामन्याबाबत कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे खेळाडू तसेच संपूर्ण जगाने त्याचा आनंद घेतला पाहिजे, असे स्पष्ट मत पाकचा कर्णधार बाबर आझम याने व्यक्त केले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बाबर पुढे म्हणाले, भारत-पाकिस्तान सामने नेहमीच अटीतटीचे राहिले आहेत. या अतितटीच्या सामन्यांचे संपूर्ण जग आनंद घेते आणि आम्ही पण मैदानात खूप एन्जॉय करत असतो. माझ्या मते भारत-पाकिस्तान सामन्यावरून क्रिकेटचा दर्जा खूप चांगला आणि स्पर्धात्मक आहे, हे दिसून येते. भारत-पाकिस्तान ज्या-ज्या वेळी होतो त्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात कारण, दोन्ही संघ नेहमीच 100 टक्के परफॉर्मन्स देतात. नेहमीच प्रतिस्पर्धी संघाबरोबर खेळायला मजा येते. असेही त्याने नमूद केले.
पाकिस्तानने नुकतीच अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 3-0ने जिंकली. आता पाकिस्तान जगातील क्रमांक 1चा वन डे फॉरमॅटमधील संघ झाला असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे आयसीसी क्रमवारीतील हा ताज घेऊन ते आशिया चषक 2023मध्ये खेळायला उतरतील. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने 268 धावांचे लक्ष्य ठेवले होते आणि प्रत्युत्तरात अफगाण संघ 209 धावांवर गारद झाला.
बाबर क्रमवारीत प्रथम
बाबर आझम सध्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये असणाऱ्या पाकिस्तान संघाला हरवणे एवढे सोपे होणार नाही. ते नक्कीच ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतील कारण, मागील आवृत्तीत ते अंतिम फेरीत श्रीलंकेकडून पराभूत झाले होते.
आशिया चषकाची सुरुवात 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने होणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरमध्ये प्रवेश करतील. या टप्प्यातील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळतील. ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. भारताचा अ गटातील पहिला सामना 2 सप्टेंबरला पल्लेकेले येथे पाकिस्तानशी होणार असून त्यानंतर 4 सप्टेंबरला त्यांचा नेपाळशी सामना होणार आहे.