विश्व स्पर्धेत सुवर्णपदक
| बर्मिंघम | वृत्तसंस्था |
भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय अंध क्रीडा संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्व स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने 9 गडी राखत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत आणि ऑस्ट्रेलियामधील अंतिम सामना बर्मिंघम येथे खेळण्यात आला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. यानंतर डकवर्थ लुईस नियमामुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले.
महिला संघाने साखळीतील सर्व सामने जिंकले आणि अपराजित राहिला. भारतीय संघाने अंतिम सामन्यात 20 षटकामध्ये 114 धावांवर ऑस्ट्रेलिया संघाला रोखलं होते. ऑस्ट्रेलियाने यादरम्यान 8 गडी गमावले होते. भारताने यानंतर 3.3 षटकामध्ये 42 धावा केल्या. यानंतर डकवर्थ लुईस नियमामुसार भारताला विजयी घोषित केलं.
गेल्या आठवड्यात हे अंध क्रिकेट संघांचे सामने सुरु झाले होते. यावेळी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना पार पडला. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेला हा विश्वचषकातील पहिला अंतिम सामना होता. जो भारताने 9 गडी राखत जिंकला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात फार चांगली झाली नाही. चौथ्या षटकामध्ये त्यांनी पहिला गडी गमावला. यानंतर ऑस्ट्रेलियाने पॉवर-प्लेमध्ये 29 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 39 धावांवर 3 गडी बाद होती. यानंतर सी लुईस आणि वेबेक यांनी 54 धावांची भागीदारी करत डाव सावरला. पण भारताने पुनरामगन करत ऑस्ट्रेलियाला रोखलं. अखेर ऑस्ट्रेलियाने 20 षटकामध्ये 114 धावा केल्या.
भारताने आव्हानाचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली. भारताने फक्त 3.3 षटकामध्येच 42 धावा ठोकल्या.त्याचबेळी पाऊस आला. यानंतर नियमानुसार भारताला विजयी घोषित केलं.
पुरुष अंध संघ उपविजेता

भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाला पाकिस्तानकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर पाकिस्तानने सुवर्णपदकावर कब्जा केला. 20-20 षटकांच्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. व्हीआर ड्युनासोबत पहिल्या सहा षटकांत 50 धावांची भागीदारी करून डीआर टोम्पकीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. ड्युनाने 18 चेंडूत 20 तर टोमपाकीने 51 चेंडूत 11 चौकारांसह 76 धावा केल्या. एस रमेशनेही 29 चेंडूत 48 धावांची नाबाद खेळी खेळून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने 15 व्या षटकातच विजयाची नोंद केली. गोलंदाजीमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक होती. त्यांनी अतिरिक्त म्हणून 42 धावा खर्च केल्या, ज्यामुळे पाकिस्तानला विजयाची नोंद करणे सोपे झाले.