चित्रलेखा पाटील यांच्यासह दिग्गज मंडळींची उपस्थिती
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नवरात्रौत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर रविवारी (दि.25) अलिबागमध्ये महागरबा महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते. चित्रलेखाताई पाटील पुरस्कृत पीएनपी सांस्कृतिक कलाविकास मंडळ अलिबाग आणि चेंढरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा रंगला. या संगीतमय उत्सवात शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच तरुण तरुणांनी, ग्रामस्थ पारंपरिक पोशाखात एकत्र येऊन महागरब्याचा आनंद लुटला.
यावेळी जिल्हा सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, वृषाली ठोसर, ॲड. अश्वीनी ठोसर, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, अलिबाग पंचायत समिती सदस्या अंजली ठाकूर, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी सभापती अनिल चोपडा, डॉ. साक्षी पाटील, संजना कीर, ॲड. निवेदिता वाघमारे, जमाल सय्यद, ॲड. परेश देशमुख, चेंढरेचे माजी सरपंच दत्ता ढवळे, युवा नेतृत्व हर्ष ढवळे, अलिबाग तालुका पुरोगामी युवक प्रमुख विक्रांत वार्डे आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आणि तरुण-तरुणी उपस्थित होते.
शेकापच्यावतीने पीएनपी नाट्यगृहाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महागरब्यात अनेक मंडळी सहभाग घेतला. गाण्यांच्या सुरावर ठेका घेऊन प्रत्येकजण आपल्या शैलीमध्ये गरब्याचे सादरीकरण करीत होते. नवरात्री संपल्यानंतरही कोजागिरीच्या दुग्धशर्करा रात्रीत गरब्याचा आणि दांडियाचा रंग अधिकच गडद झाला होता. चंद्रप्रकाशाच्या साक्षीने हजारो तरुण-तरुणी पारंपरिक पोशाखात एकत्र येऊन या संगीतमय उत्सवाचा आनंद घेत होते. कोजागिरीची शांत, आल्हाददायक रात्र आणि गरब्याचा जल्लोष यांचा एक सुंदर संगम या निमित्ताने पाहायला मिळाला. पारंपरिक आणि आधुनिक संगीताच्या तालावर चालणाऱ्या पारंपरिक गरब्यासोबतच आधुनिक डीजे आणि लाइव्ह बँडच्या गाण्यांवर अनेकजण थिरकत होते. रात्री उशिरापर्यंत चालणारा महागरबा या महोत्सवांचे मुख्य आकर्षण ठरले. दरम्यान, नृत्यांचे सादरीकरण होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकांचा गौरवही करण्यात आला. अलिबागमधील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर साठ्ये यांनी पॅरिस ते मुंबईच्या विमान प्रवासात एका वयोवृद्ध प्रवाशाला जीवनदान दिले. आठ तासांच्या प्रवासात त्यांनी आपले कर्तव्य बजावताना माणुसकीही जपण्याचे काम केले. त्यांच्या या कार्याचे कौतूक म्हणून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते डॉ. साठ्ये यांचा सन्मान करण्यात आला.
