बच्चे कंपनींना अधिक पसंत
। खांब-रोहे । वार्ताहर ।
दिवाळी सणानिमित्त बच्चे कंपनीसाठी रेडिमेड किल्ले दाखल झाले असून विविध आकार व प्रकारचे गड-किल्ले बच्चे कंपनींच्या पसंतीस उतरत असल्याचे व रेडिमेड किल्ले खरेदी करण्यासाठी अधिक पसंत करीत असल्याचे दिसून येत आहे.
दिवाळी सणामध्ये बच्चे कंपनीमध्ये विविध गड-किल्ले बनविण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. अशावेळी आपली तहानभूक विसरून बच्चे कंपनी गड-किल्ले बनविण्यात मग्न झालेले असतात. किंबहुना दिवाळी सुट्टीत तो त्यांच्या आवडीचाच छंद बनून जातो. परंतू सध्याच्या तंत्रज्ञान व मोबाईलच्या युगात प्रत्येक बाबतीत झटपट रिझल्ट हवा असतो. लहान मुलेही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे गड-किल्ले बनविण्यासाठी बच्चे कंपनी अधिक परिश्रम न घेता बाजारात विक्रीसाठी आलेल्या रेडिमेड किल्ल्यांना अधिक पसंती देऊन रेडिमेड किल्ले खरेदी करण्याकडेच त्यांचा अधिक कल दिसून येत आहे.
बाजारात फेरफटका मारला असता ठिकठिकाणी रेडिमेड किल्ले विक्रीसाठी ठेवण्यात आले असल्याचे दिसत आहेत. तर रेडिमेड किल्ले विविध आकार व प्रकारचे असल्याने बच्चे कंपनीचा कलही रेडिमेड किल्ले खरेदी करण्याकडे असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर किल्ला सजविण्यासाठी मावळे, प्राणी व छत्रपती शिवरायांचे छोटे पुतळेही खरेदी करून आपला रेडिमेड किल्ला अधिक आकर्षक कसा होईल यासाठी बच्चे कंपनीची धडपड चालली असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन पहायला मिळत आहे.
बाजारात रेडिमेड किल्ले दाखल
