। पाताळगंगा । वार्ताहर ।
दिवाळी ह्या सणात ग्रामीण भागामध्ये दगड, वीटा, मातीपासून किल्ले तयार केले जातात. मात्र, शहरामध्ये किल्ले बनविण्यात अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे पीओपीपासून तयार केलेले रेडिमेड किल्ले विकत घेतले जातात. त्यामुळे या किल्ल्यांना मागणी वाढली असून किल्ले बनविण्याऱ्यांची दिवाळी या सणाच्या निमित्ताने चांगली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
ग्रामीण भागात जरी लहान मुले किल्ले बनवीत असली तरी, शहरात हवी तेवढी जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण रेडिमेड किल्ल्यांना पसंती देतात. यामुळे या किल्यांचे मुल्यही वाढलेले आहे. सध्या तयार असलेल्या किल्ल्यांनाही चांगली मागणी असून शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत असल्याने तसेच, हे किल्ले वजनाने हलके असल्यामुळे दिवाळीनंतर ते घरात कोठेही ठेवता येतात. यामुळे किल्ले बनविणारे किल्लेप्रेमींची मागणी असेल तसे किल्ले बनवून देत असतात.
हे किल्ले पाहण्यास आकर्षण दिसत असल्यामुळे प्रत्येकजण हे किल्ले आवर्जून खरेदी करीत असल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे. किल्ला बनवायचा म्हटले की माती, विटा, रंग या सर्व गोष्टीची आवश्यकता असते. तसेच प्रत्येकांकडे वेळेची मर्यादा अल्प असल्याने अनेकजणांचे पाय रेडीमेड किल्ल्यांकडे वळत आहेत. किल्ला विक्रीतून काहींना रोजगार मिळत आहे.