सोनारी येथे स्वयंसहायता समूहांचा मेळावा उत्साहात

। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) पंचायत समिती उरणच्या माध्यमातून व ग्रामपंचायत सोनारी यांच्या सहकार्याने सोनारी येथे स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून पं.स. सभापती समीधा म्हात्रे, उपसभापती शुभांगी पाटील, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्या वैशाली पाटील, सदस्य दीपक ठाकूर, सोनारी सरपंच पूनम कडू व सर्व सदस्य, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ, जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर पाटील, तालुका अभियान व्यवस्थापक प्रतिम सुतार, बँकसखी गौरी कडू, समुदाय संसाधन व्यक्ती किशोरी कडू, अंकिता तांडेल, जसखारच्या समुदाय संसाधन व्यक्ती प्रीती ठाकूर आदी उपस्थित होत्या. या मेळाव्यात 21 स्वयंसहायता समूहांनी बनवलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. सदर मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी गट विकास अधिकारी नीलम गाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या मेळाव्यात महिलांनी स्वतःहून बनवलेले अनेक पदार्थ, केक, बिर्याणी, जवळा भाकरी यासारखे खाद्यपदार्थ, दिवाळीचे फराळ, फटाके, शोभेच्या वस्तू अशा अनेक प्रकारच्या उत्पादनांना विक्रीस आणले होते. पंचक्रोशीतील अनेक ग्राहकांनी मेळाव्यास भेट दिली व खरेदी-विक्रीची मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. सर्व महिलांनी सरपंच तसेच सर्व सदस्य व ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले.

Exit mobile version