। माणगाव । वार्ताहर ।
शासनाच्या धोरणानुसार मोठ्या उत्साहाने प्रवेशोत्सव सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात आला. माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमशाळा उत्तेखोल आश्रमशाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शनिवारी (दि.15) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.
शालेय दर्शनी भागात रांगोळी, फुले आदींची सजावट करुन वर्गखोल्यांना फुगे व पताकांची सजावट करण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट उभे करण्यात आले होते. ढोल ताश्यांच्या गजरात व औक्षण करून गुलाब पुष्प देऊन नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
हा स्वागतोत्सव समारोह कार्यक्रम आश्रम शाळेचे शालेय समिती अध्यक्ष महादेव सखाराम जाधव, वनवासी कल्याण आश्रम संकुल समिती सहसचिव नितीन चांदोरकर, शालेय समिती सदस्य लक्ष्मण जंगम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेणचे प्रतिनिधी सूर्यवंशी, शाळेचे मुख्याध्यापक अरुण पाटील, उत्तम पाटील, पालक वर्ग, अधीक्षक, अधीक्षिका शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.