। केरळ । वृत्तसंस्था ।
कोरोना महामारीत आत्ता कुठे सावरत असताना आता देशात मंकीपॉक्स विषाणूचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. संयुक्त अरब अमीरातीवरुन केरळमध्ये परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या रुग्णाला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केरळमध्ये मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हायरसपासून बचावासाठी चाचण्या व इतर उपाययोजनांसाठी केरळ सरकारच्या मदतीसाठी मल्टि डिसिप्लिनेरी सेंट्रल टीन तैनात करण्यात येणार आहे.
केरळमध्ये एक मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला आहे. रुग्ण 12 जुलै रोजी युएईहून केरळात परतला होता. त्रिवेंदम विमानतळावर हा व्यक्ती उतरला होता, असं केरळाच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी म्हटले आहे. केरळ आरोग्य विभागाने मंकीपॉक्स विषाणूच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. दरम्यान, रुग्णाची तब्येत स्थिर असून त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काय आहेत या रोगाची लक्षणे
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होते. लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतं. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरिरावर हे डाग तसेच राहतात. प्राण्यांना जर हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संबंध आला तर माणसाच्या शरिरात हा विषाणू प्रवेश करु शकतो. तसंच, रुग्णांचे वापरलेले कपडे किंवा रुग्णांशी थेट संबंध आल्यानंही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत लक्षणे दिसतात.