वृक्षारोपण, स्वच्छतेसह जनजागृती उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
री सस्टेनेबिलिटी लिमिटेडच्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात (एमडब्ल्यूएमपी) जागतिक पर्यावरण दिन विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. एमआयडीसी तळोजा येथे आयोजित कार्यक्रमात शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमास तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण भगत, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम व दिलीप चौहान, घोटचे नगरसेवक नितेश पाटील तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथील प्राध्यापक डॉ. सुनीला एर्नम यांची प्रमुख उपस्थिती होती. कंपनीचे क्लस्टर हेड सोमनाथ मालगर, प्रकल्प प्रमुख अभिषेक पांडे आणि एचआर व प्रशासन प्रमुख संदीप महाजन यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास आणि जबाबदार कचरा व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सुनीला एर्नम यांनी पर्यावरणीय आरोग्य, सार्वजनिक आरोग्य आणि शाश्वत जीवनशैली याविषयी विशेष जनजागृती सत्र घेतले.
कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, श्रमदान, पर्यावरण संरक्षणासाठी स्वाक्षरी अभियान, कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती तसेच ‘बेस्ट आऊट ऑफ वेस्ट’ प्रकल्पाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. वृक्षारोपण मोहिमेत शेकडो रोपांची लागवड करण्यात आली. स्वच्छता आणि जनजागृती उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली.
यावेळी बोलताना सोमनाथ माळगर यांनी पर्यावरण संवर्धन ही केवळ उद्योगांची नव्हे तर समाज आणि प्रशासनाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. परिपत्र अर्थव्यवस्था आणि शाश्वत पर्यावरणीय उपाययोजनांप्रती कंपनी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचा समारोप सर्व उपस्थितांनी पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन करण्यात आला.
