। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तळोजा वसाहतीच्या विकासात भर पडल्यामुळे सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवात वाढ झाली आहे. त्यामुळे तळोजा पोलीस हद्दीत यंदा 33 ठिकाणी सार्वजनिक; तर अडीच हजारांहून अधिक घरगुती गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील वेगाने विकसित होणार्या नोडपैकी एक असलेल्या तळोजा नोडमध्ये खासगी विकसकाकडून मोठ्या प्रमाणात गृहसंकुले बांधण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून मुंबई तसेच उपनगरांमध्ये कामानिमित्त जाणारा चाकरमानी मोठ्या प्रमाणात या भागात वसला आहे; तर गेल्या वर्षभरात सिडकोच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गतदेखील विविध गटातील सहा हजारांहून अधिक कुटुंबीयांना घरे उपलब्ध झाल्यामुळे या विभागाच्या लोकसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
त्यामुळे तळोजा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या विविध गावे तसेच नावडे आणि तळोजा वसाहतीमधील सार्वजनिक तसेच घरगुती गणपतींच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे.
कोरोनाकाळात उत्सवाचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, यंदा शासनाकडून निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्यामुळे तळोजा पोलिस ठाणे हद्दीतील गावे आणि वसाहतीत गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे.
जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळोजा