। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्त्व शालेय स्तरावर, महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी तसेच, संसदेचे कामकाज कसे चालते हे विद्यार्थ्यांना समजावे यासाठी रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय खारघर येथे महापालिकेच्यावतीने अभिनव संकल्पना घेऊन माझी वसुंधरा 5.0 अंतर्गत गुरूवारी (दि. 13) पर्यावरण संसदचे आयोजन करण्यात आले होते.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. उपक्रम उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सूचनेनुसार महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या माझी वसुंधरा अभियानातील महत्त्वाच्या घटकांची माहिती व्हावी यादृष्टीने पर्यावरण संसदचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात, केएलई महाविद्यालय कळंबोली, पिल्लई कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, एसके कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स नेरूळ या चार महाविद्यालयांचे विद्यार्थी, रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष वाय.टी देशमुख, संस्थेचे संचालक संजय भगत, महानगरपालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.