900 एकर जंगल, अडीच लाख झाडे, पेज नदी धोक्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल-खलाटी परिसरात प्रस्तावित टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पामुळे तब्बल 900 एकर परिसरातील जैवविविधता, वनसंपत्ती आणि जीवसृष्टी धोक्यात येणार असल्याचा आरोप करत उद्या सोमवारी (दि. 18) एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
पर्यावरण कार्यकर्त्यांच्या मते, या प्रकल्पासाठी वन विभागाच्या सुमारे 640 एकर जमिनीवर परिणाम होणार असून, हजारो औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होण्याचा धोका आहे. प्रकल्प उभारणीदरम्यान अंदाजे अडीच लाख झाडांची तोड होणार असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे कर्जत तालुक्याच्या पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
या प्रकल्पामुळे कर्जत आणि ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी मानली जाणारी पेज नदी प्रदूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीच्या प्रवाहावर परिणाम झाल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
याशिवाय प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे जंगलतोड वाढेल, वन्यप्राण्यांचे स्थलांतर मार्ग बाधित होतील आणि पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होईल, असेही सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात उभारण्यात येणारे लोखंडी टॉवर आणि 400 केव्हीए क्षमतेच्या वीजवाहिन्यांमुळे शेती, पर्यटन आणि ग्रामीण जीवनमानावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, टॉवर उभारणीसाठी वापरली जाणारी जमीन कायमची नापीक होऊ शकते. बांधकामासाठी मुरूम टाकणे, रस्ते तयार करणे आणि मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने जमिनीची सुपीकता कमी होईल. उच्चदाब वाहिन्यांमधून निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कर्जत तालुक्याच्या नैसर्गिक सौंदर्यावर या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होणार असल्याने भविष्यात पर्यटकांची संख्या घटू शकते, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समिती आक्रमक
कर्जत पर्यावरण बचाव संघर्ष समिती यांनी टोरंट पॉवर प्रकल्पासह पोशिर आणि शिलार धरण प्रकल्पांनाही तीव्र विरोध दर्शवला आहे. समितीच्या मते, हे प्रकल्प कर्जत तालुक्याला प्रदूषण आणि पर्यावरणीय विनाशाच्या दिशेने नेणारे आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या 18 मे रोजी धरणे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
