| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरात असलेल्या काळोखी भागात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा पडून होता. पावसाळा जवळ आल्याने हा प्लास्टिक कचरा नवीन झाडांचे रोपांसाठी त्रासदायक ठरणार होता. हे लक्षात घेऊन स्थानिक पर्यावरणप्रेमी तरुणांनी तब्बल एक ट्रॅक्टर भरून कचऱ्याचे संकलन केले आहे.
माथेरान शहरात गेली काही वर्षे ‘माथेरानचे पर्यावरण प्लास्टिकमुक्त करूया’ आणि ‘पर्यावरण वाचले तरच पर्यटन वाढेल’ या धैर्याने जंगलात उतरून प्लास्टिक कचरा उचलण्याचे कार्य काही तरुण करत आहेत. पावसाळा येण्याआधी या कचऱ्याचे संकलन जंगलाच्या विविध भागात उतरून करण्याचा प्रयत्न असतो. राकेश कोकळे हे तरुण कार्यकर्ते माथेरानच्या जंगलात पर्यटकांकडून टाकण्यात आलेला कचरा उचलत असतात. सुरुवातीची दोन वर्षे त्यांना केवळ माथेरानमधील रस्त्यांची कामे करण्यासाठी आणलेल्या साहित्यांच्या रिकाम्या पिशव्यांचा कचरा उचलावा लागला होता. सिमेंट पेव्हर ब्लॉक आणि दगड आणण्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या वापरल्या जातात. काम झाल्यावर त्या जंगलात फेकून दिल्या जातात. तसेच, पर्यटक येथील जंगलात फिरत असताना सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटल आणि खाऊचे रॅपर जंगलात टाकून दिले जातात. असाच प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढिग मिनीट्रेन रेल्वे ट्रॅकजवळ काळोखी परिसरात मोठ्या प्रमाणात साचून राहिला होता. हा कचरा पावसाळा सुरू होईपर्यंत असाच राहिला तर त्या प्लास्टिकमुळे नवीन झाडे रुजण्याची कार्यवाही थांबते. हे कारण लक्षात घेऊन राकेश कोकळे पर्यावरण सांभाळण्याचे काम करीत असतात.
काळोखी भागातील खालच्या बाजूच्या जंगलात हजारो प्लास्टिक बॉटल्स व रॅपर्स विखुरलेले आढळले. नगरपरिषद कर्मचारी भगवान, चंदर आणि मामा या तिघांना सोबतीला घेऊन राकेश कोकळे यांनी तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून तो सर्व प्लास्टिक कचरा उचलून नगरपरिषदेच्या ताब्यात दिला. महिन्यावर येऊन ठेपलेला पावसाळ्यात हाच कचरा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन पुढील जंगल परिसराचे मोठे नुकसान झाले असते. त्यामुळे वेळेत केलेली ही स्वच्छता मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. साधारण एक ट्रॅक्टर भरेल एवढ्या मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा बॅग भरून कचरा बाहेर काढण्यात आला.
माथेरान नगरपरिषदेने या ठिकाणी कचरा कुंड्या बसवाव्यात. तसेच, पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश देणारे आकर्षक स्लोगन त्या कचरा कुंडीवर लावावेत तसेच जनजागृती बॅनर लावावेत, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा कचरा टाकण्यास आळा बसेल. या मोहिमेत पालिकेतील गटनेते शिवाजी शिंदे आणि स्वच्छता विभागाचे सहकार्य लाभले.
– राकेश कोकळे, पर्यावरण स्नेही
