| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान मधील मायरा पॉइंट येथील जंगलात टाकण्यात आलेल्या प्लास्टिक कचरा आणि रिकाम्या बाटल्या उचलण्यासाठी शुक्रवारी श्रमदान करण्यात आले. निसर्गप्रेमी राकेश कोकळे आणि त्यांच्या सहकार्यांकडून 25 बॅग भरून कचरा दरीमधून बाहेर काढण्यात आला. जंगलात गेली काही दिवस निसर्ग प्रेमी राकेश कोकळे आणि त्यांच्या सहकार्यांकडून कचरा उचलण्यासाठी श्रमदान सुरू असते.
शहरात येणारे पर्यटक यांच्या आवडीचा बनलेला मायरा पॉइंट भागातील जंगलात आणि दरीमध्ये उतरून प्लास्टिक कचरा,पाण्याच्या रिकाम्या बॉटल आणि खाऊचे रॅपर असा सर्व कचरा दिवसभर श्रमदान करून गोळा केला.या श्रमदानात माथेरानचे महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे, माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी देखील श्रमदानातून सहभाग घेतला. त्यावेळी राकेश कोकळे यांच्या ग्रुपमध्ये निसर्ग प्रेमी तरुण सहभागी झाले होते. मायरा पॉइंट येथील जंगलात 25 हून अधिक बॅग पिशव्या कचरा संकलित करण्यात आला आणि तो कचरा तेथून काढून पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये नेण्यात आला.