डोळ्यांच्या साथीचा प्रादुर्भाव

| पनवेल | वार्ताहर |

बदलत्या वातावरणाच्या परिणामामुळे व वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात डोळे येण्याची साथ पसरली आहे. कडक ऊन, मध्येच पावसाळा, ढगाळ वातावरण असे उष्ण-दमट हवामान आहे. हवेमध्ये दमटपणा वाढला की संसर्गजन्य रोग जंतूंना पोषक वातावरण मिळते, त्यामुळे संसर्गजन्य आजारात वाढ होत आहे. या दिवसांत इतर आजारांसोबत डोळ्याचे विकारही जडत आहेत. डोळे आल्याने डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यात काहीतरी खूपल्यासारखे वाटणे, डोळे लालबुंद होणे अशी लक्षणे आढळतात. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये डोळ्यांच्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव झाला आहे. डोळे सुजणे, चुरचुरणे, लाल होणे, पाणी येणे, त्यातून घाण बाहेर येणे, बघण्याला त्रास होणे आदी लक्षणांनी या साथीचे रुग्ण वैतागून गेले आहेत. या दिवसात बहुतांशी शाळांमध्येप्रथम सत्रांत परीक्षा सुरू आहेत. त्यापैकी काही शाळांतील लहान मुले डोळे येण्याच्या समस्येने हैराण झाले आहेत. रुग्णालयांत या साथीने रुग्ण उपचार घेतांना दिसून येत आहेत.

हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे, डोळ्यांना हातांचा स्पर्श करु नये, प्रखर उन्हात फिरु नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, दोन ते तिन दिवसांनी आपोआप डोळे बरे होतात. नाही झाल्यास रुग्णालयात उपचारासाठी जाणे, लहानग्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

Exit mobile version