| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या असलेल्या नेरळ जंक्शन रेल्वे मेकओव्हर सुरु आहे. यात फलाट दोनवरील विकासकामांनी वेग घेतला असून, फलाट दोनवर आता सरकता जिना तयार होत आहे. याबाबत नेरळ स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मावळ लोकसभा मतदारसंघाचे खा. श्रीरंग बारणे यांचे आभार मानले जात आहेत. मध्य रेल्व वरील जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ रेल्वे स्थानकात खा. श्रीरंग बारणे यांच्याकडून गेली पाच वर्षे अनेक विकासकामे सुरु आहेत. स्थानकात उतरल्यावर बाहेर जाण्यासाठी स्काय वॉक तसेच फलाट एक वर दोन ठिकाणी सरकते जिने उभारले गेले आहेत. निवारा शेड तसेच पादचारी पुलांची उभारणी पूर्ण झाली आहे. फलाट दोनवर सरकता जिना उभारला जात असून, त्या सरकत जिन्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा सरकता जिना जुन्या पेपर स्टॉलजवळ आणि माथेरानकडे जाणाऱ्या मिनीट्रेन यांच्या स्थानकात उतरत आहे. त्यामुळे माथेरानकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. त्या सरकत जिना उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.







