छत्रीला बूम बनवून कर्जत कोंदिवडे रस्त्याची दाखवली व्यथा
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात कर्जत-कोंदिवडे राज्यमार्ग रस्ता दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील खड्ड्यात हरवला आहे. रस्त्यातील खड्ड्यांबाबत शालेय विद्यार्थिनींनी शासनाची टर ओढणारा व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
कोंदिवडे भागातील दोन शालेय विद्यार्थिनी या आपल्या घरी निघाल्या होत्या. कोंदिवडे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांना दररोज चालतच प्रवास करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा प्रवास अलीकडेच थांबतो. त्यामुळे दररोज चालत जायचे आणि त्यात कधी एखादे वाहन आले तर अंगावर चिखल उडण्याची भीती असते.
दररोजच्या खड्ड्यातून घरी जाण्याच्या प्रवासाला कंटाळत तीन मुलींनी एक व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ बनवताना त्यातील दोन मुली रिपोर्टर बनल्या आणि एक व्हिडिओग्राफर, तर वाहिन्यांचे रिपोर्टर बनल्यावर हातात बूम हवा. त्यावेळी त्यातील एक विद्यार्थिनीने आपल्या हातातील छत्रीचा बूम म्हणून वापर केला आणि सोबतच्या मैत्रिणीला रस्त्याविषयी विचारले. त्या मुलीने हा हायवे असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न करीत अत्यंत सराईत टीव्ही रिपोर्टरप्रमाणे रस्त्याची झालेली अवस्था आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केली. तर अत्यंत ज्येष्ठ पत्रकारासारखे विश्लेषण त्या मुलांनी आपल्या कर्जत कोंदिवडे रस्त्याविषयी केले. त्यामुळे हा सोशल मीडियावर अपलोड झालेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.






