। मुंबई । वृत्तसंस्था ।
केवळ साखर उत्पादनाकडे लक्ष दिले तर ते भविष्यकाळात उद्योगासाठी संकट ठरेल. त्यामुळे उद्योगाच्या चांगल्या भविष्यासाठी साखरेचे इथेनॉलमध्ये रूपांतर करावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स 2022 मध्ये ते बोलत होते.सध्या आपल्याकडे तांदूळ, मका आणि साखरेचे अतिरिक्त उत्पादन आहे, याचीही आठवण त्यांनी करून दिली. देशांतर्गत आणि जागतिक साखर व्यापारातील प्रमुख आव्हाने, त्याबाबतची धोरणे आणि साखर उद्योगाच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी आघाडीच्या आणि जागतिक उद्योग तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणणे, तसेच भारतात अधिक नावीन्यपूर्ण आणि शाश्वत साखर आणि इथेनॉल क्षेत्र तयार करण्यासंबंधी चर्चा करणे हा या परिषदेचा उद्देश आहे.
डिझेल आणि पेट्रोलवर चालणार्या वाहनांपेक्षा इथेनॉलचे आर्थिक समीकरण लाभदायक आहे. अनेक मोठ्या वाहननिर्मिती कंपन्याही आता फ्लेक्स इंजिनांची मोटार बनवत आहेत. त्यांच्यामागोमाग फ्लेक्स इंजिनाच्या स्कूटर, मोटारसायकल व रिक्षाही बाजारात येतील, हे देखील गडकरी यांनी दाखवून दिले.







